'अच्छे दाग' आणि धर्मांधतेचे चष्मे
‘अच्छे दाग’ आणि धर्मांधतेचे चष्मे
![]() |
| फोटो सौजन्य: गूगल. |
एका सोसायटीत मुलं रंग खेळतायत. पांढरेशुभ्र कपडे घातलेली एक मुलगी सायकलवरून येते, मुलं तिच्यावर मनसोक्त रंग टाकतात, पिचकाऱ्या, फुग्यांनी तिला पूर्ण रंगवून सोडतात. तीही त्यांना चिडवल्यासारखं करत मजा लुटते. शेवटी रंग संपून जातात, पाणी, फुगे, सगळंच संपतं. ती मुलगी परत येऊन एका छोट्या मुलाला हाक मारते. डोक्यावर पांढरी टोपी आणि तसेच कपडे चढवलेला तो मुलगा तिच्यामागे सायकलवर स्वार होतो. ती त्याला मशिदीपाशी आणून सोडते. आत जाता जाता मागे वळून तो म्हणतो, “नमाज पढ़ कर आता हूँ l” “बाद में रंग पड़ेगा l” ती उत्तरते. तो चटकन मान डोलावून आत जातो अणि भारताच्या एकात्मतेचा संदेश देत जाहिरात संपते.
“किती सुंदर केलंय हे!” हीच माझी पहिली उत्फूर्त प्रतिक्रिया होती. मग प्रश्न पडला की यात काय आहे आक्षेप घेण्याजोगं? ट्विटरवर थोडी शोधाशोध केल्यावर लक्षात आलं की लोकांना यात लव्ह जिहादपासून ते धार्मिक गोष्टींत ‘परदेशी कंपन्यां’ची ढवळाढवळ अशा अनेक गोष्टी ‘आक्षेपार्ह’ वाटतायत. अर्थात, असेही अनेक लोक होते ज्यांनी या जाहिरातीचं कौतुक केलंय. पण आक्षेप घेणारे महाभाग अर्थातच जास्त आहेत. प्रत्येक वेळी मुलगी हिंदू आणि मुलगा मुसलमान असंच का? हे उलट करण्याची हिंमत आहे का? हे लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारं आहे. परदेशी कंपन्यांचा आपल्या देशातलं सामाजिक संतुलन बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे असे अनेक हास्यास्पद आरोप केले गेलेत.
पहिला मुद्दा लव्ह जिहादचा. या जाहिरातीत तो येतोच कुठे? एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांचे फक्त प्रियकर-प्रेयसीच असू शकतात हे कुठलं अजब तर्कशास्त्र आहे? त्या दोघांची घनिष्ट मैत्री नाही असू शकत? दुसरा मुद्दा, ज्यांना भारताने स्वीकारलं, ज्यांची उत्पादने घरोघरी पोचली, वापरली गेली त्या कंपन्या अचानक परदेशी होतात? आणि धार्मिक बाबतीत ढवळाढवळ म्हणजे नेमकं काय? एका हिंदू सणाचा अतिशय कल्पकतेने जाहिरातीसाठी करून घेतलेला वापर आणि त्याला दिलेली हिंदू-मुस्लीम ऐक्याची जोड यात कुठे आली ढवळाढवळ? मुलगी हिंदू आणि मुलगा मुसलमान का? उत्तर सोपं आहे, कारण जाहिरातकर्त्यांना तसं दाखवावंसं वाटलं. ते उलट केल्याने असं काय वेगळं काय साध्य होणार आहे? मशिदीत जाणारी मुलगी तरी आपल्याला पचेल का? की त्यातही आपण काहीतरी आक्षेप शोधत राहू? प्रत्येक हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा यांचं होणारं लग्न हे लव्ह जिहादच असतो का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कुठल्याही गोष्टीकडे बघताना धर्मांचे, वादांचे, संघर्षांचे चष्मे घालण्याची गरजच काय?
आपल्या चित्रपट, टीव्ही, जाहिरातविश्वात अबला, बिचारी असलेली मुलगी आणि तिच्या मदतीला धावून येणारा कणखर प्रिन्स चार्मिंग हे चित्र अतिशय सामान्य आहे. या जाहिरातीत मात्र एका मुलाच्या मदतीला येणारी मुलगी दिसते. गाडी चालवणारा पुरुष आणि मागे बसलेली स्त्री याउलट मुलीच्या मागे सायकलवर बसलेला मुलगा दिसतो. समाजाने स्त्री-पुरुषांना दिलेल्या साचेबद्ध भूमिकांची ही अदलाबदल आणि आपल्यात खोलवर रुतून बसलेल्या लैंगिक भूमिकांना या जाहिरातीने दिलेला छेद नक्कीच विचार करायला लावणारा आणि महत्वपूर्ण आहे.
या जाहिरातीने दिलेला धार्मिक सलोख्याचा संदेशही महत्वाचा आणि अत्यंत लोभसपणे दिलेला आहे. होळीच्या रंगात रंगून जाताना नमाजच्या वेळेचं भान ठेवणारी आणि त्याचं पावित्र्य जपणारी माणसं किती आश्वासक आहेत! अर्थात, हिंदूंची होळी वेगळी, मुस्लिमांचा नमाज वेगळा इतकं कट्टरही यातलं चित्रण नाही. नमाज झाल्यावर तो मुलगाही रंगांमध्ये रंगून जाणार आहे, धर्म, सण यांच्या सीमारेषा पार पुसल्या जाऊन फक्त प्रेमाचं, निरागसतेचं आणि ऐक्याचं नातं शेवटपर्यंत राहणार आहे हाच या जाहिरातीचा गाभा म्हणावा लागेल. गरज आहे ती आपल्या डोळ्यांवर आपण चढवलेले साचेबद्ध भूमिकांचे, पूर्वग्रहांचे आणि धार्मिक विद्वेषांचे चष्मे काढून टाकण्याची. समाज म्हणून, प्रेक्षक म्हणून निर्भेळ, निकोप दृष्टीने आजूबाजूला बघण्याची आणि जे मग मनाला भावेल, त्याला भरभरून दाद देण्याची.

Comments
Post a Comment