चिकित्सेचं 'प्रश्नचिन्ह' आणि अंधभक्तीचे पूर्णविराम
![]() |
| छायाचित्र सौ.- एबीपी माझा |
विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राजकीय व्यासपीठांवर पुन्हा एकदा मतामतांचा धुरळा उडाला. एबीपी माझा या वाहिनीने 'सावरकर...नायक की खलनायक?' या चर्चेचं आयोजन केलं आणि एका नव्या सामाजिक माध्यमवादाला तोंड फुटलं. फेसबुकवर मोठ्यामोठ्या पोस्टी पडल्या, एबीपी माझावर टीकेची झोड उठली आणि त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची जणू मोहीमच सुरू झाली. याची वाहिनीने थोड्या जास्तच गंभीरतेने दखल घेतली आणि सारवासारव करण्याच्या हेतूने की काय, लगेचच 'आम्ही सावरकरप्रेमी बोलतोय...' असा एक कार्यक्रम घेतला. आता या शीर्षकाचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय'शी असणारं साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा का? हा प्रश्न निराळा.
पहिला मुद्दा, कार्यक्रमाचं नाव, ज्यावर 'तुम्ही सावरकरांना खलनायक म्हणताच कसे?' असा प्रश्न उपस्थित केला गेला. सावरकरांनी अंदमानात फिरवलेला कोलू, देशासाठी केलेला त्याग वगैरे गोष्टी आळवल्या गेल्या. यातल्या प्रत्येकाच्या खोलात आत्ता जाण्यात काही अर्थ नाही, कारण आजचा विषय वेगळा आहे. तर, कार्यक्रमाचं नाव. काय आहे हे नाव? 'सावरकर...नायक की खलनायक?' यात प्रश्नचिन्ह आहे! सावरकरांवर कुठलाही शिक्का मारण्यापेक्षा त्यांच्या कार्याकडे, व्यक्तिमत्वाकडे, विचारांकडे चिकित्सक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न म्हणून याकडे बघणं इतकं अवघड का जातंय? ते प्रश्नचिन्ह सोयीस्करपणे नजरेआड केलं जातंय की ते उभं करण्यावरच आक्षेप आहे?
दुसरं म्हणजे पॅनलमधल्याही दोघांनी नावावर नाराजी व्यक्त केली, पण त्याचवेळी सावरकरांकडे चिकित्सक दृष्टीने बघण्याची गरजही बोलून दाखवली. सावरकरांचे माफीनामे, त्यांचा जहाल हिंदुत्ववाद, मुस्लिमद्वेष, अखंड हिंदुराष्ट्राची कल्पना यावर आक्षेप घेतले गेले आणि सावरकरप्रेमींचीच बाजू काहीशी असमर्थ ठरताना, विषयाला फाटे फोडताना आणि व्यक्तीपूजेकडे झुकताना दिसली. पण आमंत्रित पॅनल समतोल होतं आणि तुटपुंज्या वेळातही ही चर्चा बऱ्यापैकी तटस्थपणे झाली. परंतु, समाजमाध्यामांवर बहिष्काराचं आवाहन करणाऱ्या किती सावरकरप्रेमींनी ती पाहिली? यासंदर्भातल्या फेसबुक पोस्टवरच्या बहुतांश प्रतिक्रिया पाहता हे प्रमाण फारच कमी असावं. या प्रतिक्रियांची भाषा बघून मायबोली मराठीसाठी इतकं बहुमोल काम करणाऱ्या सावरकरांना
तिसरा मुद्दा म्हणजे यावर एबीपी माझाने घेतलेली भूमिका. 'सावरकर...नायक की खलनायक?' ही चर्चा मुळातच घेणं हेच धाडस आहे. याचे पडसाद उमटणं अगदीच स्वाभाविक होतं, कारण आपण काही माणसांना देवतुल्य करून ठेवलेलं आहे. त्यांच्यावर विचारलेले प्रश्न, केलेली टीका, घेतलेले आक्षेप आम्हांला सहनच होत नाहीत. हा विचार वाहिनीने निश्चितच केला असेल. मग टीकेची झोड उठल्यावर सारवासारव कशासाठी? 'आम्ही सावरकरप्रेमी बोलतोय...'ची गरजच काय, जेव्हां मूळ चर्चेतही सावरकरप्रेमींना बोलण्यासाठी पुरेसा वाव होता? आणि मग तो एकच का? त्याला लागून किंवा मागेपुढे 'आम्ही सावरकरांचे टीकाकार बोलतोय' असा कार्यक्रमही घ्यावा. याला एकतर्फी उदात्तीकरण म्हणायचं का? जनरेट्यापुढे झुकून वाहिनीने आपली भूमिका बोथट करण्याचं कारण काय? फक्त टीआरपी कमी होण्याची भीती?
चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा. एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे, व्यक्तीकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता आपण समाज म्हणून गमावतोय का? आपली भक्ती इतकी उथळ आहे का की एका वाहिनीवरच्या चर्चेमुळे तिला तडे जावेत आणि त्या वाहिनीवर बहिष्कार घालण्याची आवाहनं केली की ती पुनर्स्थापित व्हावी? बहिष्कार, शिवराळ आणि अश्लाघ्य भाषा, आणि अंधभक्ती ही आपली नवी हत्यारं झालीयेत का? माध्यमांचे दर्शक, वाचक म्हणून आणि जबाबदार नागरिक म्हणून याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. माध्यमांचं स्वातंत्र्य आणि भूमिका, इतिहासातले खरेखोटे, जुनेनवे दाखले, नोंदी या सगळ्याकडे डोळ्यांवरच्या अंधभक्तीच्या पट्ट्या हटवून बघणं हे सशक्त लोकशाहीसाठी गरजेचं आहे, पायाभूत आहे. व्यक्ती कुणीही असो, सावरकर असोत, सरदार पटेल असोत, नेहरू असोत किंवा गांधी. यातल्या कुणालाच 'नायक किंवा खलनायक' या घट्ट चौकटीत कोंबणं चुकीचंच नाही, अशक्य आहे. त्यांना टाकाऊ समजण्याइतकंच त्यांचं अंधानुकरणही अयोग्य आणि घातक आहे. म्हणूनच, आज सगळ्यात जास्त गरज आहे ती निष्कर्षावर पोचण्याची घाई न करता चर्चा करण्याची. बहिष्कारासारख्या अपरिपक्व भूमिकेपेक्षा टोकाच्या विरोधी भूमिकाही ऐकून, समजून घेण्याची.
गरज आहे ती आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला कळत नकळत आपणच दिलेले भक्ती, प्रेम इत्यादींचे पूर्णविराम पुसून टाकण्याची. कालसुसंगतीचं आणि संविधानिक मूल्यांचं प्रश्नचिन्ह तिथे कोरण्याची आणि कोरत राहण्याची.
-अंकिता आरती अक्षय.

कुठल्याही विचारी सामान्य माणसाला जे वाटत तेच मांडलं आहे. समर्पकपणे. मला तर नेहमीच अशा व्यक्तिपूजा किंवा 'भक्ती'चे आश्चर्य वाटत आलेय. आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे टोकाचा द्वेष. चिकित्सा तर नकोच आज चर्चापण करणे शक्य नाही.
ReplyDeleteअसो, ह्या घटना आजच्या एकूणच परिस्थितीबद्दल खूप काही सांगतात. पण असही वाटत की नकोच आपल्या मूलभूत प्रश्न सोडून कुठल्याच मुद्द्यावर बोलायला.