१३३ वर्षांची 'डॉक्टर आनंदी'
१३३ वर्षांची ‘डॉक्टर आनंदी’
आनंदीबाई जोशींना मेडिकल
कोलेज ऑफ पेन्सिल्वेनियाची एम्. डी. पदवी मिळून आज १३३ वर्षं झाल्याचं वाचलं आणि
नुकत्याच पाहिलेल्या ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातला एक प्रसंग डोळ्यासमोर आला. आपलं
तान्हं बाळ केवळ उपचार उशिरा मिळाल्यामुळे गेलेलं, सुन्न होऊन बसून राहिलेल्या
आनंदीला समजावणारे गोपाळराव आणि एका क्षणी कुठल्याशा अनामिक जिद्दीने ‘मी डॉक्टर
होऊन दाखवीन.’ अशी शपथ घेणारी आनंदी.
सुमारे १५० वर्षांपूर्वीचा तो
काळ. समाजात तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्यांचं ते घर आणि अशा घरात राहून इतकं
धाडसी स्वप्न बघणारी तरुण आनंदी. मुलीचं शाळेत पडलेलं पाऊलही ज्या समाजाच्या
दृष्टीने अपशकुनी आणि धर्मबुडवं, तिथे सातासमुद्रापार जाऊ बघणाऱ्या आनंदीच्या
वाटेतल्या अडथळ्यांची कल्पनाच करावी फक्त. चित्रपटात तिच्या घरासमोर कचरा फेकणारे,
तिला शिव्यांची लाखोली वाहणारे लोक हे याच समाजाचे प्रतिनिधी. या सगळ्याला पतीच्या
साथीने का होईना, पण एक स्त्री म्हणून तोंड देत देत आपलं स्वप्न जिद्दीने उरात
जपून ठेवणारी आनंदी किती खंबीर म्हणावी!
मोठ्या प्रयत्नांनंतर या
जोडप्याला दिसलेला आशेचा किरण म्हणजे वाईल्डर कार्पेंटर. वाईल्डर कार्पेंटर हे
अमेरिकेतले एक प्रसिद्ध मिशनरी होते आणि गोपाळरावांच्या पत्राला उत्तर देत त्यांनी
या धडपड्या जोडप्याला मदतीचा हात देऊ केला. पण त्यांची एक अट होती, की आनंदी आणि
गोपाळरावांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला पाहिजे. खरंतर हे आमिष भारी लोभस. ज्या
धर्माने आपल्या पायात बेड्या घातल्या, तो दूर सारून दुसऱ्या धर्मात मिळणारा प्रवेश
आणि सहजपणे उघडले जाणारे अमेरिकेचे, आनंदीच्या स्वप्नांकडे तिला घेऊन जाणारे
दरवाजे! पण या मानी जोडप्याने ते नाकारले. धर्मांतर म्हणजे आगीतून फुफाट्यात हे
त्यांनी जाणले असावे.
पण जिद्दीला
नशिबाने अखेर साथ दिल्याप्रमाणे वाईल्डर कार्पेंटर यांनी प्रिन्सटन्स मिशनरी
रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध केलेला त्यांचा पत्रव्यवहार थिओडिशिया कार्पेंटर या
बाईंच्या हातात निव्वळ योगायोगाने पडला. एका स्त्रीची जिद्द आणि तिला साथ देणाऱ्या
तिच्या पतीचा ध्यास सातासमुद्रापार बसलेल्या दुसऱ्या स्त्रीने ओळखला आणि हीच पुढे
आनंदीची ‘कार्पेंटर मावशी’ झाली! प्रेमळ पत्रं लिहिणारी, कलकत्त्यात असताना आजारी
पडलेल्या आनंदीसाठी अमेरिकेहून औषधं पाठवणारी आणि अमेरिकेत तिला प्रेमाने उतरवून
घेणारी.
कलकत्त्याला असतानाच आनंदीची
प्रकृती बिघडली होती. अशा परिस्थितीत अमेरिकेसारख्या, संपूर्ण वेगळं, अतिशय थंड
वातावरण असलेल्या देशात जाणं हे घातक होतं. तेव्हां जर हा बेत काही काळ पुढे ढकलता
आला असता तर आनंदी कदाचित वाचली असती, तिच्या स्वप्नातली रुग्णसेवा मनोभावे करू शकली
असती का? या विचाराने मन हळहळतं, पण त्याच वेळी कितीही प्रतिकूलता असली, तरीही
मनातली जिद्द कायम ठेवून वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एकटीने बोटीची पायरी
चढणाऱ्या आनंदीला सलामही ठोकला जातो.
अनोळखी देश, कमालीची थंडी आणि
आहाराच्या बाबतीत धर्माने लादलेली बंधनं यामुळे आनंदीची तब्येत ढासळत गेली हे उघड
आहे. पुन्हा इथे जर-तरचे इमले रचायचे म्हटले, तर याच धर्माने घातलेली कितीतरी
कुंपणं पार करून इथपर्यंत पोचलेली आनंदी या गोष्टी झुगारून का नाही देऊ शकली? हा
प्रश्न सतावत राहतो. पण तिच्या याबाबतीतल्या ठाम भूमिका हेच याचं उत्तर असावा.
याबाबतीत गोपाळरावांनीही तिच्यावर दबाव आणला होता असेही उल्लेख आहेत. या सगळ्यामुळे
अखेरीस आनंदी क्षयाच्या विळख्यात सापडली, पण तशातही जिद्दीने अभ्यास चालू ठेवत
अखेर आजच्याच दिवशी १३३ वर्षांपूर्वी ‘डॉक्टर आनंदीबाई’ झाली. तिच्यासोबतच पदवी
मिळवलेल्या केई ओकामी (जपान) आणि सबत इस्लामबौली (सिरीया) या दोघीही त्यांच्या
देशातल्या पहिल्याच महिला डॉक्टर होत्या.
१८८६मध्ये भारतात परतलेल्या
आनंदीचा वर्षभराच्या आतच २६ फेब्रुवारी १८८७ रोजी मृत्यू झाला. स्वतः महत्कष्टाने
मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्यासारख्या असंख्य लोकांना व्हावा हे सुंदर स्वप्न
बघणारी आनंदी अवघ्या एकविसाव्या वर्षी चिरनिद्रेत विसावली.
चित्रपटात समुद्राच्या किनारी बसून रुग्णांची सेवा
करण्याची, पण अपूर्ण राहिलेली इच्छा बोलून दाखवणारी आनंदी, तत्कालीन आणि आजच्याही
समाजाने स्त्रीभोवती घालून दिलेली जुलमी चौकट उद्ध्वस्त करून अगणित स्त्रियांसाठी
असंख्य नव्या वाटा खुल्या करणारी आनंदी आणि १३३ वर्षांनंतर आजही तितक्याच
प्रेरणादायी असणारी आनंदी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत १३३ वर्षांपूर्वी ज्या
दिवशी तिने तिचं ध्येय गाठलं, त्या आजच्या दिवशी तिच्या जिद्दीला सलाम!
- अंकिता आरती अक्षय.

Missing your personal touch Anki. Though written very well, sounds too official and biographic. Informal, conversation like, simple, heart touching language and versatile flow of Marathi is your forte. Keep it going dear. Heartiest congratulations on your first blog. Look forward to reading many more from you. All the best and God bless.....
ReplyDeleteYes, it for our official blog. Can't get too personal there.
Delete